औरंगाबाद: नागपूर-मुंबई महामार्गावरील नारळा फाटा येथे कारच्या धडकेत दुचाकीवरून जाणारे दोन जण ठार झाले. ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. देविदास बाजीराव गवळी (वय 21 वर्षे, रा. गवळी शिवरा, ता. गंगापूर) व त्यांची वयोवृद्ध मावशी या अपघातात ठार झाली. त्यांचे नाव समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास गवळी हे गवळीशिवरा येथून आज मंगळवारी सकाळी मावशीला सोडण्यासाठी दुचाकीवरून लासूर स्टेशन येथे जात होते. मुंबई महामार्गावरून जात असताना नारळा फाटा येथे समोरून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या धडकेत देविदास गवळी यांची वयोवृद्ध मावशी रस्त्यावर जोरात आपटली. त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर देविदास गवळी हे रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडले होते. येणार्या-जाणार्या वाहनधारकांनी देविदास गवळी यांना उपचारासाठी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले.
तेथील डॉक्टरांनी गवळी यांना तपासून मृत घोषित केले, तर त्यांच्या मावशीला लासूर स्टेशन येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या अपघातामुळे मुंबई महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. अपघाताची माहिती शिल्लेगाव पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.